ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप तर…आता निर्णायक आंदोलन !

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसी लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईमागे फडणवीस यांचा हात होता, असा दावा जरांगेंनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, “फडणवीसांनी आदेश दिले नसते, तर पोलिसांची हिंमत झाली नसती.” यासोबतच, त्यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर चढण्याची शक्यता आहे.

१ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरवाली सराटी (जालना) येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला होता. या घटनेने मराठा समाजात संतापाची लाट उसळली होती. जरांगे यांनी फडणवीसांवर निशाणा साधत म्हटले, “अंतरवालीत जे घडलं, ती चूक पुन्हा करू नका. आमच्या डोक्यावर मारलं, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. फडणवीस, तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका. तुम्हाला जे करायचं ते करा, पण पुन्हा त्या भानगडीत पडू नका. ही धमकी नाही, हे मी समजावून सांगतोय, कारण तुम्हाला ती खोड आहे.”

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, तसेच कुणबी जातीच्या नोंदी असलेल्या मराठ्यांना आणि त्यांच्या ‘सगे-सोयरे’ यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी केली आहे. त्यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. “पहिल्या आंदोलनात निघालेला जीआर योग्य होता, पण अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली,” असं मनोज जरंगे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. “ही लढाई निर्णायक आहे. एकदा मी मुंबईच्या दिशेने निघालो, तर माघार नाही. मराठा समाजाचा विजयाचा गुलाल उधळायचाच,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!