जास्वंदीचं फूल केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असल्याचं आयुर्वेदात मानलं जातं. बदलत्या जीवनशैलीत नैसर्गिक उपायांकडे लोकांचा कल वाढत असून, जास्वंदीच्या फुलांचं पाणी हे एक प्रभावी नैसर्गिक टॉनिक म्हणून ओळखलं जात आहे. नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा उजळते आणि अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते.
जास्वंदीच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळतं. तसेच हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करत असल्याने त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहते. मुरुम, त्वचेची ॲलर्जी यामध्येही याचा फायदा होतो.
केसांच्या आरोग्यासाठीही जास्वंदीचं पाणी उपयुक्त ठरतं. केसांच्या मुळांना पोषण मिळाल्याने केस गळती कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही हे पाणी लाभदायक ठरू शकतं, कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.
महिलांसाठी जास्वंदीचं पाणी विशेष फायदेशीर मानलं जातं. अनियमित किंवा वेदनादायक मासिक पाळीमध्ये यामुळे आराम मिळतो आणि हार्मोनल संतुलन सुधारण्यास मदत होते. तसेच चयापचय वाढवून वजन कमी करण्यासाठीही हे पाणी उपयुक्त ठरत आहे. पचनसंस्थेच्या दृष्टीनेही जास्वंदीचं पाणी प्रभावी आहे. गॅस, ॲसिडिटी, अपचन यासारख्या तक्रारी दूर होतात आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.
जास्वंदीच्या फुलांचं पाणी तयार करण्यासाठी २ ते ३ ताजी लाल फुले स्वच्छ धुवून २ कप पाण्यात ५ ते ७ मिनिटे उकळावीत. पाणी गुलाबी रंगाचं झाल्यावर ते गाळून मध किंवा लिंबाचा रस मिसळून सेवन करता येतं. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिल्यास अधिक लाभ होतो.
नैसर्गिक, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेलं जास्वंदीचं पाणी नियमित आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल पुढे टाकता येईल, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे.