ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयंत पाटील भाजपमध्ये येणार”; सदाभाऊ खोत यांचा दावा, पाटलांचा पलटवार !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सत्तेशिवाय ते फार दिवस राहू शकत नाहीत. कधी उडी मारायची याचीच ते वाट पाहत आहेत, असा टोला खोत यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला.

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना–महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली.

खोत म्हणाले की, तब्बल २० वर्षे मंत्री राहूनही त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही. साधे रस्तेही झाले नाहीत, कोणताही ठोस विकास झाला नाही. जनता कायम गरिबीतच राहावी आणि आपल्यासमोर गुलामासारखी यावी, या मानसिकतेतूनच त्यांनी काम केले. मात्र आता परिस्थिती बदलत असून काटे उलटे फिरू लागले आहेत. त्यामुळे ते फार दिवस तिकडे बसणार नाहीत आणि लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा त्यांनी केला.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचा मुद्दाही उपस्थित केला. क्रांतीसिंह नाना पाटील यांची सेवा नाईकवाडे यांनी केली, मात्र त्यांचे स्मारक उभारावे असे यांना कधी वाटले नाही. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावाने कॉलेजसाठी निधी मंजूर केला होता. मात्र सत्ता गेल्यानंतर त्या कॉलेजला निधी मिळू दिला नाही. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी तो निधी पुन्हा मंजूर केला, असा आरोपही खोत यांनी केला.

वाघवाडी फाट्यावरील काम तुम्ही सरकारमध्ये असताना का रोखले? ‘मी सोडून दुसरा कोणी मोठा होता कामा नये’ हीच तुमची मानसिकता आहे. जनता आता तुम्हाला थांबवणार आहे, असा घणाघाती टोला खोत यांनी लगावला.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कुणीतरी म्हणाले की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत. दहा पक्ष बदलून गेलेला एक बाबा माझे नाव घेऊन बोलतोय. भाजपलाही माहिती आहे की हा कुणाचाच नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!