सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना – एकनाथ शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांची चर्चा जोरात होती, परंतु गुरुवारी ज्योती वाघमारे यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे माहिती समोर आली आहे.
ज्योती वाघमारे यांचे नाव राज्यसभेसाठी येताच सोलापुरातून सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन या जबाबदारीची संधी दिल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जाते. ज्योती वाघमारे यांचा इतिहास सोलापुरच्या आंबेडकरी चळवळीत आक्रमक नेतृत्वाचा आहे. मोची समाजातील गरीब कुटुंबातून आलेल्या ज्योती वाघमारे यांचा मार्ग अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या वडिलांचा सामाजिक कार्यातील सहभाग आणि सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांचा अनुभव ज्योती यांच्यावरही दिसतो.
शिवसेनेत प्रवेश करण्याआधी त्यांनी महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणूनही काम केले होते. पण नंतर त्यांनी राजकारणापासून थोडा वेळ अंतर ठेवला. जून 2022 मध्ये शिवसेनेत घडलेल्या फुटी नंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि महिला नेतृत्वाची पोकळी भरून, पक्षाची आक्रमक प्रवक्ता म्हणून भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक जाहीर सभांमध्ये आपली ताकद दाखवली. ज्योती वाघमारे यांच्याकडे राज्य प्रवक्ता पदासोबत संपर्कप्रमुख धाराशिव जिल्ह्याची जबाबदारीदेखील आहे. त्यांच्या अनुभव आणि नेतृत्वामुळे सोलापूरसह राज्यभर महिला नेतृत्वाच्या उभारीसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. यामुळे सोलापुरकरांचा उत्साह वाढला असून, राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाचीही दखल घेण्यात येत आहे.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी
* इंग्रजी साहित्यात पीएचडी
* दहावीच्या परिक्षेत ज्योती वाघमारे यांना ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
* बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम
* महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
* १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव
* सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील श्री. नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी श्री. नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटरचे तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले.
* चळवळीतील कामाचा पोचपावती म्हणून सोलापूरमधील नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत श्री. नागनाथ वाघमारे यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी काहीकाळ वृत्त निवेदिका म्हणून काम केलं.
* पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली.
* वालचंद महाविद्यालयात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्राध्यापिका म्हणून काही काळ काम केले.
* महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि राज्याच्या राजकारणावरील सखोल अभ्यासपूर्ण भाषण ही प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची वैशिष्ट्ये आहेत.
* सलग तीन दसरा मेळाव्यात घणाघाती भाषणातून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
* जनतेतला धडाकेबाज चेहरा खासदार झाल्यास सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विस्तारासाठी फायदा होईल.
WhatsAppFacebookTwitterEmailShare