बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असतांना नुकतेच संतोष देशमुख हत्याकांड व खंडणी यात देखील आरोपी विष्णू चाटे याने वाल्मीक कराडने खंडणीसाठी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात वाल्मीक कराडचा पाय आणखी पाय खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणासह पवनचक्की कंपनीकडून तब्बल 2 कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्याने वाल्मीक कराडने आपल्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसंदर्भात बोलणी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा खुलासा झाला आहे.
वाल्मीक कराडवर विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप आहे. विष्णू चाटेने तशी कबुली दिली आहे. सीआयडीच्या अहवालानुसार, विष्णू चाटेने मान्य केले आहे की, वाल्मीक कराडने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांशी माझ्या फोनवरून संवाद साधला होता. त्यात त्याने 2 कोटींची खंडणी मागितली होती. तशी तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत केली होती. विष्णू चाटे याच्या या कबुलीमुळे वाल्मीक कराडच्या अडचणींत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे यासंबंधीचा एक पीसीआर रिपोर्टही समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये नमूद आहे की, विष्णू चाटे याच्या फोनवरून खंडणी मागण्यात आली होती. त्यावेळी वाल्मीक कराड स्वतः तिथे उपस्थित होता. त्याने चाटे याच्या फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली. सीआयडीच्या तपासात तसा स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे वाल्मीक कराडवरील खंडणी मागितल्याच्या आरोप स्पष्ट झाल्यामुळे त्याच्या अडचणींत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे.