नाशिक : वृत्तसंस्था
देशभरात आज मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाठिकाणी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पंतग उडवताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोनू किसन धोत्रे असे या तरुणाचे नाव आहे. नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी मांजामुळे विविध दुर्घटना घडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू धोत्रे हा पाथर्डी इंदिरानगर भागातून जात असताना नायलॉन मांजाने त्याच्या गळ्यावर गंभीर जखम झाली. यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सोनू धोत्रेचा नायलॉन मांजामुळे मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आम्ही ज्या मांजामुळे ही घटना घडली, तो मांजा ताब्यात घेतला. सध्या हा तपास सुरु आहे. आम्ही मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत ९ जणांवर कारवाई केली आहे. मांजा वापरणारे हे सर्व लोक सुशिक्षित आहेत. लवकरच यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करणार आहेत.