नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. तर आता इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी पोलीस प्रशांत कोरटकर याला अटक करतील म्हणजे करतीलच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसात प्रशांत कोरटकर हा दुबईला असल्याची माहिती पुढे आली, छायाचित्रही व्हायरल झाला याबाबतीत छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले कुठलीही शहानिशा न करता बातम्या दिल्या जात आहेत. मुळात कोरटकर हा दुबईलाच नव्हे तर आणखी कुठेही असला तरी पोलीस त्याला नक्की शोधून काढतील आणि अटक करतील, करतील म्हणजे करतील. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला. 17 मार्च पर्यंत त्याची अटक पुढे गेली. यानंतर उच्च न्यायालयात सुनावणीत त्याला पुन्हा अभय मिळाले.
दरम्यान, कोरटकरला तात्काळ अटक करा. त्याला उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ देऊ नका. पोलीस प्रशासन जेवढा जास्त उशिर करेल. तेवढा अधिक वेळ कोरटकरला मिळेल. यामुळे तात्काळ अटक करा. अन्यथा शिवरायाचें मावळे त्याला सोडणार नाहीत. मावळे कायदा हातात घेऊ इच्छित नाही. कृपया त्यांना यासाठी भाग पाडू नका असा इशारा नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी दिला. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र ही लिहिले आहे.