अक्कलकोट, दि.२९ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर ते कुरनूर या नव्या बससेवेला सोलापूर आगाराने बुधवारपासून प्रारंभ केला याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.सध्या कुरनूरला अक्कलकोट आगाराची बस सेवा सुरू आहे परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गेल्या
अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची थेट सोलापूरला जाण्यासाठी बस असावी अशी मागणी होती यासाठी सरपंच व्यंकट मोरे,सदानंद पोतदार व अन्य ग्रामस्थ मंडळींनी सोलापूरच्या विभाग नियंत्रकांकडे या संदर्भातील मागणी रीतसर निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार संबंधित गावाचा सर्व्हे होऊन या गाडीला विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी मंजुरी दिली.यासाठी आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजूटगी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.पहिली बस सकाळी पावणे नऊ वाजता सोलापूर येथून सुटणार आहे ती मार्केट यार्ड, बोरामणी, तांदुळवाडी ईटकळ, केशेगाव, निलेगाव, हन्नूर, चुंगी मार्गे सकाळी साडेदहाच्या सुमारास ती कुरनूरला पोहोचेल. त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता निघून ती साडेबारा वाजता सोलापूरला पोहोचेल.यानंतर दुसरी
बस दुपारी दीड वाजता सोलापूरहून निघेल.
ती सव्वा तीन वाजता कुरनूरला येईल.त्यानंतर साडेतीन वाजता कुरनूरहुन निघून सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ती सोलापूर येथे पोहोचेल,अशी माहिती महामंडळाने दिली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बस सेवा सुरू झाल्याने डब्याची सोय तसेच शेतकऱ्यांना देखील किरकोळ स्वरूपाच्या शेतीचा माल नेण्यासाठी या गाडीची मोठी सोय होणार आहे.या बससेवेचे बुधवारी कुरनूर ग्रामस्थांनी स्वागत केले आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. येत्या गुरुवारपासून ग्रामदैवत हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा आहे या पार्श्वभूमीवर ही गाडी सुरू करण्यात आल्याने कुरनूरकरांचा आनंद नक्कीच द्विगुणीत झाला आहे, असे सरपंच व्यंकट मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.