अमरावती : मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असुन ते ३२ वर्षांचे होते. हरिसाल येथील सरकारी घरामध्ये ही घटना गुरूवारी सायंकाळी ७च्या सुमारास घडली.
मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण या २०१४ला एमपीएससी मार्फत वन विभागात रुझु झाल्या. मेळघाटात लेडी सिंघम म्हणून दीपाली चव्हाण यांची ओळख होती. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली पोस्ट मिळाली होती. २०१९मध्ये त्यांची हरीसालला बदली झाली.
दरम्यान हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हरिसालच्या वन परीक्षेत अधिकारी दिपाली चव्हाण यांच्याकडे राहत असलेल्या त्यांच्या आई गुरुवारी जळगावला गेल्या होत्या. त्या सायंकाळी परत येत असताना खामगाव जवळ त्यांना दिपाली चव्हाण यांचा फोन आला. ‘आई मी आता शेवटचं बोलते आहे’, असे म्हणून दिपाली चव्हाण यांनी फोन ठेवला. यामुळे त्यांच्या आई घाबरल्या आणि त्यांनी हरिसल येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले.
दीपाली चव्हाण गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. सदर सुसाईड नोटमध्येही उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या वाईट वागणुकीविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. शिवकुमार यांच्या मर्जीने वागत नसल्याने माझे वेतन रोखण्यात आले, मानसिक छळ केला जात होता. गर्भवती असताना त्यांनी मला अमरावतीला सासरी जाऊ देण्याची परवानगीही फेटाळून लावली होती, असेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.