नाशिक : वृत्तसंस्था
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. या आधी टिकणारे आरक्षण दिले गेले. मात्र, त्याच काळात राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे संबंधितांनी त्याकडे योग्य लक्ष न दिल्याने न्यायालयातून ते फेटाळले गेल्याचा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. नाशिक दौऱ्यावर आलेले असताना ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
गिरीश महाजन म्हणाले की, जरांगे-पाटील यांच्यासह मी भुजबळांची भेट घेऊन चर्चा केली. माझ्यासह मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनीदेखील संबंधितांनी वाद करू नये. काही वक्तव्यांमुळे दोन समाजांत वाद निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये हीच अपेक्षा आहे. मराठा आरक्षण आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणालाही धक्का लावायचा नाही हेदेखील वारंवार सांगितले आहे. त्या दृष्टीने मराठा समाज आरक्षणाविषयी सरकारचे अत्यंत गतीने प्रयत्न सुरू आहेत. क्युरेटिव्ह याचिकेमुळे आता पुन्हा संधी निर्माण झाली असून, जरांगे-पाटील यांच्यावर उपोषणाची वेळच येणार नसल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना महाजन पुढे म्हणाले की, श्रीराम मंदिरासाठी अनेकांनी योगदान दिले असून, काहींनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंनीच दिली, असे काही नाही. अयोध्येत कारसेवक योगदान देत असताना उद्धव ठाकरे घरात बसून होते. ते कुठेच फिरकले नाहीत. त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेसाठी आमंत्रण दिले नाही, यावरून त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.