बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या हालचाली सुरु झाल्या असतांना आता भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे या राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून. यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
वैद्यनाथ बँकेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी यशश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन बिनविरोध यश मिळवले होते. यंदाही दोघे एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
यशश्री मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तिसरी कन्या असून पेशाने वकील आहेत. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एल. एल. एम ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांना कॉर्नेल विद्यापीठाकडून, “प्रॉमिसिंग आशियाई विद्यार्थी” म्हणून गौरवण्यात आले होते. पंकजा आणि प्रीतम यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले, तर यशश्री यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. इतकी वर्षे त्या राजकारणापासून काहीशा दूर होत्या. मात्र आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.
वैद्यनाथ बँकेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यशस्वी मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले. सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागांसाठी 52 अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी 4 अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती (विमाप्र) च्या एका जागेसाठी 4 अर्ज, इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी एका जागेसाठी 6 अर्ज, आणि महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ यंदा बिनविरोध निवडले जाणार की निवडणूक होणार, याबाबत उत्सुकता आहे. 29 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांचे नाव राज्यातच नाही तर देशातल्या राजकारणात नावाजलेले आहे. त्यांचा राजकीय वसा घेत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंनी राजकारणात स्वत:ला सिद्ध केले. पंकजा मुंडे दोन वेळा विधानसभेवर निवडून आल्या आहेत. तर आता त्या विधान परिषदेच्या आमदार आणि राज्याच्या मंत्री आहेत. तर, प्रीतम मुंडे या दोन वेळा बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिलेल्या आहेत. आता गोपिनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अर्ज दाखल केला आहे.