मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे व सभा घेण्याचा तडाखा सुरु असून नेत्यावर देखील टीकास्त्र केले आहे. काही नेते आपल्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला आम्ही पाठिंबा दिला आहे. वेळ पडली तर आंदोलनात सहभागी होण्याचा शब्दही दिला आहे. त्यामुळे ओबीसी व मराठा असा कसलाही वाद नाही, असे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
निलंगा येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. तशा प्रतिक्रिया ओबीसी समाजातून येत आहेत. केवळ काही नेते आपल्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला आम्ही पाठिंबा दिला आहे. वेळ पडली तर आंदोलनात सहभागी होण्याचा शब्दही दिला आहे. त्यामुळे ओबीसी व मराठा असा कसलाही वाद नाही, असे स्पष्टीकरण जरांगे-पाटील यांनी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला होता. तो अजून त्यांनी पाळला नाही. उलट काही नेते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार मराठ्यांच्या अंगावर किती मराठा नेते घालणार आहे, बघुयात. शांत आहोत, शांतच राहू द्या, कशाला वातावरण ढवळता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द ते पूर्ण करतील, असा विश्वास आहे. जर दगाफटका झाला तर आम्ही काय करणार आहोत, हे १७ डिसेंबर रोजी जाहीर करू, असेही त्यांनी जाहीर केले. लातूर जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडत नाहीत, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले, नोंदी सापडत कशा नाहीत, मुद्दाम अधिकारी त्या शोधत नाहीत. शोधू नका, असा दबाव त्यांच्यावर सरकारचा आहे, असा संशय आता वाटतोय. या भागातील नोंदी हैदराबाद येथे शोधण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्याबाबत शिंदे समितीला बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.