ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिकन-मटणाला टक्कर देणारी मसूर डाळ! आरोग्यासाठी अमृत

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना योग्य पोषण मिळत नाही. परिणामी वारंवार आजारपण, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि पोषक घटकांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी डाळी हा सर्वोत्तम आणि परवडणारा पर्याय ठरत असून, त्यातही मसूर डाळ आरोग्यासाठी विशेष लाभदायक मानली जाते.

भारतीय आहारात डाळींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाकाहारी लोकांसाठी आवश्यक असणारी अमिनो ॲसिड्स, स्नायूंची वाढ आणि दुरुस्तीसाठी लागणारी प्रथिने मसूर डाळीत मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय फायबरचे भरपूर प्रमाण पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून मुक्तता देते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मसूर डाळ लोह आणि फोलेटचा उत्तम स्रोत असल्याने रक्ताची कमतरता (ॲनिमिया) टाळण्यासाठी ती उपयुक्त ठरते. गर्भवती महिलांसाठी फोलेट अत्यावश्यक असून, बाळाच्या निरोगी वाढीस ते मदत करते. नियमित मसूर डाळ खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

विशेष म्हणजे मसूर डाळीतील कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ती उत्तम पर्याय ठरते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मसूर फायदेशीर मानली जाते, कारण ती रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात, तर अँटिऑक्सिडेंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देतात.

आरोग्यदायी आणि चविष्ट मसूर डाळ तयार करणेही अतिशय सोपे आहे. मसूर स्वच्छ धुवून कुकरमध्ये मीठ आणि आले घालून मऊ शिजवावी. कढईत तेल गरम करून जिरे आणि तमालपत्र घालून फोडणी द्यावी. त्यात टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर हिरवी मिरची, गरम मसाला, धणे आणि लाल मिरची पावडर घालून शिजवलेली डाळ मिसळावी. मंद आचेवर काही मिनिटे उकळल्यानंतर कोथिंबिरीने सजवावी.

चिकन-मटणापेक्षा हलकी, कमी कॅलरीची आणि अधिक पोषणमूल्य असलेली मसूर डाळ आज शाकाहारींचा सुपरफूड ठरत आहे. निरोगी आयुष्याची सुरुवात करायची असेल, तर रोजच्या आहारात मसूर डाळीचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!