ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिव स्मारक शोधायला चला ; संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार या तिघांनी व्यक्त केला आहे. याचाच एक भाग म्हणून संभाजीराजे छत्रपती यांच्या या आंदोलनाकडे देखील पाहिले जात आहे. हेच का अच्छे दिन, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला देखील प्रश्न विचारले आहेत.

संभाजी राजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यता मिळाली आहे. आता या पक्षाच्या वतीने राज्यातील पहिले आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई जवळ असलेल्या अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जल पूजन झाले होते. हे शिव स्मारक शोधायला चला, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवप्रेमी नागरिकांना आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे 6 ऑक्टोबर रोजी अकरा वाजता हे सर्व एकत्र जमणार आहेत. या माध्यमातून भाजप आणि राज्य सरकारवर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!