बदनापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या घटना सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद सुरु होत असतांना दिसत आहे. आता जालना आणि बीडमध्ये झालेल्या प्रचंड मारहाणीच्या घटनेनंतर आता बदनापूर तालुक्यात अटक वॉरंट घेऊन आलेल्या पोलिसांनी संशयिताला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. पोलिसांच्या या गुंडाराजमुळे नागरिक भयभित झालेत. पोलिसांना अशी मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवाल केला जात आहे. तर संबंधित पोलिस बळाच्या वापराचा आमचा अधिकार असल्याची शेखी मिरवत आहेत.
बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ दोन सख्या भांवामध्ये वाद झाला होता. या प्रकरणात न्यायालयाचे अटक वॉरंट घेऊन आलेले पोलिस कर्मचारी जोनवाळ आणि त्यांचे सहकारी जारवाल यांनी रामा दादाराव गव्हाणे यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याचा गावकऱ्यांनी व्हिडिओ केला. तो समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे.
बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथील रामा दादाराव गव्हाणे व त्यांच्या भावामध्ये 2019 मध्ये वाद झाला होता. रामा गव्हाणे विरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र न्यायल्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, ते न्यायल्यात हजर न झाल्याने रामा गव्हाणे विरुद्ध आजामीनपात्र पकड वारंट काढण्यात आले. हे वॉरंट घेऊन 7 मार्च रोजी पोलिस कर्मचारी प्रताप जोनवाल व त्यांचा सहकारी जारवाल ढोकसाळ येथे गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.
पोलिस कर्मचारी जोनवाल आणि जारवाल संशयित गव्हाणे यास ताब्यात घेऊन निघाले. यावेळी या दोघांनी गव्हाणे यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी संशयिताने मोठ्याने आरडाओरड केली. मला असे ओढू नका, मला शर्ट तरी घालू द्या, अशी विनवनी त्यांनी केली. यावेळी गव्हाणे यांच्या पत्नीने रडत आणि पदर पसरत मारहाण करू नका, अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.
बीट अंमलदार प्रताप जोनवाल म्हणाले की, रामा गव्हाणे विरुद्ध पकड वॉरंट असल्याने आरोपीस आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. आवश्यक बळाचा वापर करण्याच्या अधिकार आम्हाला आहे. आरोपीचे मेडिकल करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने जामीन दिला. आम्ही कायदेशीर कारवाई केली त्यात आमची चूक नाही.