मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झालेल्या असताना सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ एक भीषण अपघात घडला. रुळांवरून पायी चालणाऱ्या चार प्रवाशांना अंबरनाथ फास्ट लोकलने धडक दिली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. तर, दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आंदोलनामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवासी रुळांवरून चालत जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितले की, “सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ प्रवासी रुळांवरून चालले असताना अंबरनाथ फास्ट ट्रेनने त्यांना धडक दिली. घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.”
दरम्यान, मुंब्रा येथील अपघातप्रकरणी दोन अभियंत्यांवर जीआरपीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनांनी सीएसएमटीवर आंदोलन छेडले होते. मोटरमन आणि इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने मध्य व हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. पावणेसहा ते पावणेसात या वेळेत लोकल सेवा बंद राहिल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वे प्रशासनाने आंदोलकांसोबत तातडीने चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सायंकाळी पावणेसात वाजता लोकल सेवा हळूहळू पूर्ववत करण्यात आली. तथापि, अजूनही काही गाड्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.