अक्कलकोट : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही मात्र किराणा, फळे, दूध घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले. या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी दीपक शिंदे होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळावी यासाठी नगरपरिषद विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली होती.त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय अक्कलकोट येथे खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नगर परिषद विरोधी पक्ष नेते अशपाक बळोरगी यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर सलग दोन दिवस दोन-दोन तास लॉक डाऊन शिथीलता मिळावी. ज्यामुळे सणासाठी किराणा, दूध, फळे खरेदी करता येऊ शकतील,अशी मागणी केली. तर नगरसेवक आलम कोरबु यांनी दोन तासाचा वेळ अपुरा असून पाच ते सहा तासांची सवलत मिळावी अशी मागणी केली. मौलाना इरफान दावण्णा यांनी नमाजासाठी पाच लोकांची अट रद्द करून किमान दोनशे ते चारशे लोकांना संधी मिळावी अशी मागणी करून ते म्हणाले एक वेळ नवीन कपड्यां ऐवजी जुन्या कपड्यांचा वापर करू. दूध मिळाले नाही तर पाणी पिऊन सण साजरा करु मात्र नमाजासाठी सवलत मिळावी. नबीलाल शेख म्हणाले,कोणती नमाज शेवटची ठरेल हे सांगता येत नाही त्यामुळे ईदसाठी सवलत मिळावी. या सर्व साधकबाधक चर्चेनंतर प्रांत अधिकारी दीपक शिंदे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहता लॉक डाऊन शिथिल करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्याऐवजी ईद साठी लागणारे किराणा सामान फळे दूध हे संबंधितांना ऑर्डर देऊन घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू याकामी संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे मोजकेच कार्यकर्ते प्रतिनिधी म्हणून काम करतील तसेच पोलीस प्रशासन आणि नगर परिषद याकामी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
या बैठकीत प्रभारी प्रांत अधिकारी सुप्रिया डांगे , तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे , सलीम यळसंगी यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला मुख्याधिकारी सचिन पाटील,पोलीस निरीक्षक गोपाळ पवार गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, ज्येष्ठ नेते गफूर शेरीकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी नगरसेवक बसलींगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक सद्दाम शेरिकर, शिवराज स्वामी, माणिक बिराजदार, समीर शेख, मलिक बागवान आदी उपस्थित होते.