ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाविकांकडून जादा पैशाची लूट केल्यास लॉज मालकांवर गुन्हे दाखल होणार; दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये पोलीसांनी घेतली बैठक

अक्कलकोट,दि.२९ : अक्कलकोटमध्ये काही लॉज धारक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याचे आढळून येत आहे असा प्रकार जर यापुढे कोणी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजेंद्रसिंह गौर यांनी दिला आहे. मंगळवारी, अक्कलकोट येथे श्री दत्त जयंती अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी गौर व पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली लॉज धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी पाहून नियोजन करण्यात येत आहे.यात प्रत्येक लॉज धारकांनी वाहनाची पार्किंग व्यवस्था करून घ्यावी, रस्त्यावर वाहने लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, लॉजमधील भाविकांची नोंदवही अद्यावत ठेवावी, लॉजधारक रूम बुकिंग साठी चौकामध्ये एजंट थांबवणार नाही, लॉजमध्ये येणाऱ्या भाविकांना कोणीही जास्तीचा दर आकारणार नाही तसे आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगून लॉजच्या दर्शनी भागावर रूमचे दरफलक लावण्यात यावे इत्यादी सूचना गौर दिल्या.

सर्व लॉजधारक नियम व अटीचे पालन करतील, भाविकांना विनाकारण त्रास होणार नाही, भाविकांच्या गाड्या पार्किंग ठिकाणीच पार्किंग करून घेतील, भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतील, अशी अपेक्षा आहे नाही तर कारवाई अटळ आहे, असे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले. 

या बैठकीला अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे गोपनीय अंमलदार धनराज शिंदे, शरदचंद्र चव्हाण,गजानन शिंदे यांच्यासह अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे अंतर्गत लॉज धारक व मॅनेजर उपस्थित होते.

दत्त जयंती उत्सव शांततेत पार पाडा

श्री दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडेल यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. भाविकांना जास्तीचा दर आकारणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक कोळी बजावून सांगितले. त्यावेळी उपस्थित सर्व लॉजधारकांनी सूचनांचे पालन करण्याबाबत सहमती दर्शवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!