मुंबई वृत्तसंस्था
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते.
मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते. ते अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्रदेखील काम केलं होतं.
मधुकर पिचड यांना सलग सात वेळा विधानसभेवर आमदार म्हणून अकोलेच्या जनतेने निवडून दिलं होतं. मधुकर पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणास सुरूवात झाली होती. त्यानंतर ते अनेक खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रदीर्घ काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता अथक प्रयत्न केले. ते आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील नेहमी प्रयत्नशील राहिले.
अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मीती मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाली. त्यांनी भंडारदरा धरणाला आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे नाव देण्यासाठी अनेकदा जन आंदोलन केलं. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले. धरणाचं नामकरन नुकतंच आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे असे करण्यात आले आहे.