ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाकुंभमेळ्याव्यात चेंगराचेंगरी : बेळगावातील ४ ठार तर २० जखमी तर १४ बेपत्ता

बेळगाव : वृत्तसंस्था

देशातील उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या अमृत स्नानावेळी मंगळवारी मध्यरात्री प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो भाविक जखमी झाले. मृतांमध्ये बेळगावातील माय-लेकीसह तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. येथून गेलेल्या 60 भाविकांपैकी 14 जण बेपत्ता असून, 20 हून अधिक जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महादेवी हणमंत बावनूर (वय 48, रा. शिवाजीनगर), अरुण नारायण कोपर्डे (61, रा. शेट्टी गल्ली), ज्योती दीपक हत्तरवाट (46) व त्यांची मुलगी मेघा दीपक हत्तरवाट (24, दोघीही रा. वडगाव) यांचा समावेश आहे. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्रयागराज येथून आल्याचे जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी प्रसार माध्यमांना दिली.प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मौनी अमावस्या असल्याने अमृत स्नानासाठी गर्दी वाढली. गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी गर्दी वाढतच गेली. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडस् लावले होते. परंतु, अचानक बॅरिकेडस्चे कडे तोडून भाविक स्नानासाठी धावले. यावेळी प्रचंड चेंगराचेंगरी होऊन 30 जणांचा मृत्यू झाला; तर शेकडो भाविक जखमी झाल्याचे आतापर्यंतच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

रविवारी (दि. 26) बेळगावातील विविध भागांतून मित्र मंडळी व नातेवाईक असे तब्बल 60 जण साईरथ ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसने प्रयागराजला रवाना झाले होते. दोन दिवस सर्वत्र फिरल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री पवित्र स्नानासाठी ते सर्वांसोबत थांबले होते. बॅरिकेडस् तोडून सर्वजण संगमावर घुसल्याने प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात ज्योती हत्तरवाट व त्यांची मुलगी मेघा आधी बेपत्ता झाल्या. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचा संदेश ज्योती यांचे पती दीपक हत्तरवाट यांना बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. शहरातील शेट्टी गल्लीतील अरुण कोपर्डे व त्यांची पत्नी कांचन हे दाम्पत्य गेले होते. चेंगराचेंगरीत अरुण बेपत्ता झाले, तर कांचन जखमी झाल्या. सायंकाळी अरुण यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. शिवाजीनगरमधील महादेवी बावनूर यांचाही मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ते परत येणार होते. परंतु, तत्पूर्वीच भक्तांवर काळाने घाला घातला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!