ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई  वृत्तसंस्था 

अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा सुटल्या नंतर आता सर्वांचं लक्ष राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी याकडे लागले आहे. याबाबतच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी रात्री नवी दिल्ली गाठून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारविनिमय केला. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेच दिल्लीला गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौर्‍याकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

खातेवाटपावर व मंत्रिपदवाटपाच्या सूत्राबाबत अद्याप एकमत झालेले नाही, असे समजते. भाजपला किमान 23 मंत्रिपदे हवी असून, सध्या तरी त्यांच्याकडून 25 मंत्रिपदांची मागणी केली जात आहे. शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप होण्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणार्‍या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर, शपथविधीचा निरोप मिळताच मुंबईत लवकर पोहोचता यावे यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी कर्जत, अलिबाग आणि लोणावळा येथील फार्महाऊसेसवर तळ ठोकला आहे. आता 14 डिसेंबरचा मुहूर्त निश्चित झाल्याच्या चर्चेने आमदार सुखावले आहेत.

गृह खात्यासोबतच नगरविकास खातेही एकनाथ शिंदे यांना वा त्यांच्या शिवसेनेला देण्यास भाजपने नकार दिल्याने शिंदे अस्वस्थ असल्याचे कळते. विशेष म्हणजे, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमवारी रात्री दिल्लीवारी केली. रात्री उशिरापर्यंत फडणवीस, बावनकुळे यांची अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. यावेळी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. रात्री 2 वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!