महाराष्ट्राला ध्येयनिष्ठ शिक्षकांची गौरवशाली परंपरा आहे : विरोधी पक्षनेते अजित पवार
के.के.निकम सर यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि "कर्मयोगी" ग्रंथाचे आळंदीत प्रकाशन
आळंदी : आपल्या महाराष्ट्राला ध्येयनिष्ठ शिक्षकांची गौरवशाली परंपरा आहेत के.के.निकम सरांसारखे शिक्षक ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेत आहेत, महाराष्ट्राच्या शहर, गाव खेड्यात अध्यापन करणारे शिक्षक खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत देशाची भावी पिढी, ज्ञान, गुण, अनुभव, चरित्र संपन्न व्हावी यासाठी शिक्षक बंधू भगिनींनी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, के.के.निकम सरांवरील गौरव ग्रंथ शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त सहसचिव माजी प्राचार्य के.के.निकम सर यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा तसेच त्यांच्या जीवनचरित्रावर आधारीत कर्मयोगी या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा आणि कै.श्रीमती पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानचा उद्घाटन समारंभ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आळंदी येथील रसिकलाल धारीवाल सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, डॉ नारायण महाराज जाधव, माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, अतुल बेनके, सतीष उरसळ, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, अजित गव्हाणे, बबनराव कुऱ्हाडे, सुरेश वडगावकर, डि.डि.भोसले, विनया तापकीर, राहुल तांबे, रामदास ठाकुर, अनिकेत कुऱ्हाडे, कविता आल्हाट, अरुण बोऱ्हाडे, विजय रसाळ, नंदकुमार वडगावकर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, कुणाल तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, निकम सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे कार्य सुरू केले प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले तसेच व्यावसायिक व संपर्काधिष्ठित गुणवत्ता विकास कार्यक्रमावर भर दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्व विकासाला चालना मिळाली.
माजी खासदार अशोकराव मोहोळ म्हणाले की निकम सर यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत शिक्षक, मुख्याध्यापक, सहसचिव व उपसचिव इत्यादी पदावर विद्यार्थी दैवत मानून अत्यंत निष्ठेने व निस्पृह आणि प्रामाणिकपणे कार्य केले.