ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल; देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू !

मुंबई : वृत्तसंस्था

महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये व शहरी भागांमध्ये देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, राज्यभरातील महिलांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक पण संवेदनशील टप्पा असून, या काळात होणारे शारीरिक बदल, हार्मोनल असंतुलन, मानसिक तणाव, हाडांचे विकार, निद्रानाश व नैराश्य याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही गरज लक्षात घेऊन महिलांना विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेनोपॉज क्लिनिकची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे.

या क्लिनिकमध्ये महिलांना एकाच छताखाली तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, तसेच औषधोपचार व प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, “महिलांचे आरोग्य म्हणजेच कुटुंबाची शक्ती” या भावनेतून दिलेली ही आरोग्यदायी भेट असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा हा निर्णय देशातील इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!