मुंबई : वृत्तसंस्था
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्ष ठाम आहेत. एक किंवा दोन जागा वगळता जवळपास सर्वच जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील आहे. चार जागांचा त्यांना प्रस्ताव दिला आहे. त्यात अकोला आणि इतर तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यावर विचार करून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही भूमिका मांडली. येत्या रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दादर शिवाजी पार्कातील सभेनंतर जागावाटपाची घोषणा केली जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. वंचितने आम्ही दिलेल्या प्रस्तावाबाबत निर्णय घ्यायचा आहे. मात्र कोणत्याही समाजमाध्यमातून आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधीही केली नाही आणि करतसुद्धा नाही, असा सल्ला राऊत यांनी दिला. दरम्यान, महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश झालेला नाही. त्यासंदर्भात कोणीही, कधीही चर्चा केलेली नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.