मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आता महिलांना घर आणि नोकरी सांभाळताना मुलांच्या संगोपनाची चिंता सतावते? यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पाळणा योजना सुरू केली आहे! ही योजना नोकरदार महिलांच्या मुलांना सुरक्षित, पोषक आणि शैक्षणिक वातावरण देण्यासाठी खास आहे.
पाळणा योजना म्हणजे काय?
ही योजना ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी-कम-क्रेच केंद्रे उभारते, जिथे नोकरदार मातांना मुलांच्या काळजीची सुविधा मिळेल. यामुळे महिला बिनधास्तपणे करिअरवर लक्ष केंद्रित करू शकतील.
योजनेची वैशिष्ट्ये काय?
– सुरक्षित वातावरण : मुलांसाठी डे-केअर सुविधा, जिथे त्यांना सुरक्षित आणि आनंदी वातावरण मिळेल.
– शिक्षण : ३ वर्षांखालील मुलांसाठी प्रारंभिक उद्दीपन आणि ३-६ वर्षांच्या मुलांसाठी पूर्व-शालेय शिक्षण.
– पोषण : सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम जेवण आणि संध्याकाळी दूध/अंडी/केळी यासारखे पौष्टिक खाद्य.
– आरोग्य सेवा : नियमित तपासणी, लसीकरण आणि वाढीचे निरीक्षण.
– आधुनिक सुविधा : वीज, पाणी, शौचालय यांसारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध.
पहिला टप्पा
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकार ६०% आणि राज्य सरकार ४०% निधी देईल. ही योजना मिशन शक्ती अंतर्गत २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजूर झाली असून, आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होत आहे.
कर्मचारी :
प्रत्येक केंद्रात एक प्रशिक्षित सेविका (किमान १२वी उत्तीर्ण) आणि एक सहाय्यक (किमान १०वी उत्तीर्ण) असतील. कर्मचाऱ्यांचे वय २० ते ४५ वर्षे असेल, आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
फायदा कोणाला?
ही योजना नोकरदार महिलांना मुलांच्या संगोपनाची चिंता कमी करून त्यांना आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी आहे. मुलांना पोषण, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळेल, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल.