ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९ महापालिकांत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. या निकालांमुळे भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे.

या निकालांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांत पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. केवळ अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे.

या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेत, यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पराभवावर प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले, “दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही असा पराभव कसा होतो, हा प्रश्न आहे. ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो, याची चौकशी होणे आवश्यक आहे. लोकशाहीवरचा विश्वास टिकवायचा असेल, तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे लागेल.”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवर भाष्य करताना मिटकरी म्हणाले की, “ही बैठक नियमित स्वरूपाची होती. पवार कुटुंब हे नेहमीच एक आहे. मात्र, राजकीय एकत्रिकरणाबाबतचा निर्णय हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हेच घेतील.”

दरम्यान, या निकालांमुळे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांनाही मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी पक्षांना आपल्या जुन्या जागाही टिकवता आलेल्या नाहीत. या निकालांनंतर राज्याच्या राजकारणात ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!