वर्धा : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी जोरदार चर्चेत आणला होता त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी नाराजी झाल्याचे दिसत असतांना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील आर्वी येथे बोलत असताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.
आर्वी येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले, महाराष्ट्र देशातील पहिले असे राज्य ठरले आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण होईल. तर, नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली आहे, असे म्हणत फडणवीस यांनी येथील गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती. 80 टक्के महाराष्ट्रात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल. विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घराकरिता 2 लाख रुपये मिळतील हा निर्णय आपण केला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्यामुळे, नागरिकांना मोफत वीज मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या मागण्या आर्वीसाठी आमदारांनी, खासदारांनी केल्या आहेत त्यावर मला विचार करावाच लागेल. बार्शी उपसा सिंचन योजनेच्या फाईलवर सही मी करून येथे आलो आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. नवीन रस्त्यामुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल. रोजगार उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. दोओस येथील दौऱ्यानंतर जवळपास 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भविष्यात वर्धा जिल्ह्यासाठी ही गुंतवणूक फायद्याची आहे. यावेळी बोलताना मी वर्धाचा पालकमंत्री राहिलेलो आहे त्यामुळे माझे विशेष लक्ष असणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.