सोलापूर : प्रतिनिधी
उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नुकत्याच पूर्ण झालेल्या दुहेरी जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना आज सकाळी घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे पाहायला मिळाले, त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
ही गळती सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये, लंबोटी गावाजवळील चंदननगर भागात आढळून आली. या फुटलेल्या पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. साधारण अर्ध्या तासापासून ही गळती सुरू आहे. पाण्याचा जोर इतका होता की रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच उजनी धरण ते सोलापूर दरम्यानच्या या दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. मात्र इतक्या लवकर पाईपलाईन फुटल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.