बारामती : वृत्तसंस्था
मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रकार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतले असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मी केलं, मी केलं, मी केलं अशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीतील विकासकामांवरुन अजित पवारांनी सडकून टीका केली आहे. भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, ”सुप्रिया सुळेंच्या प्रचार पुस्तकांत मी केलेली कामं छापण्यात आली आहेत. बारामतीतील सर्व इमारती मी बांधल्या आहेत. मात्र फोटो त्यांच्या पुस्तकात दिसत आहेत. सुप्रिया सुळे मी केलेल्या कामांचं श्रेय घेत आहेत. ही कामं केली असेल तर भोर, वेल्हा आणि मुळशीत काय केले हे त्यांनी दाखवावे. नुसती भाषणं करून होत नाही. भाषणं केल्याने जनतेचं पोट भरणार नाही त्यासाठी कृती करावी लागेल”, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
याशिवाय मतदारांना अजित पवारांनी आवाहन केले आहे. ”ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज देश मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, तरी अजून काही भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मतांची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा” असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले, ”आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. काही जणांनी मला निवडून द्या, एमआयडीसी झाली नाही, तर 2019 मध्ये मत मागायला येणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र तरी ते येतात. माझे मात्र तसे नाही. मी सहजासहजी शब्द देत नाही. आणि शब्द दिला तर कोणाच्या बापाच ऐकत नाही. दिलेला शब्द मी पूर्ण करतो. कामाच्या माणसांना आपले करण्याचाही प्रयत्न करतो”, असे अजित पवार म्हणाले.