राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयापासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी मोठा प्लान आखत असतांना नुकतेच महाविकास आघाडीत बिघाली झाली कि काय अशी जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरु झाली आहे.
आता जागावाटपाची बैठक किंवा चर्चा सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच येत्या 7 ऑगस्टला जागावाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती दिली. तर याबाबत संजय राऊत यांनी आम्हाला बैठकीबाबत माहित नसल्याचे विधान केले. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याच भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळीच बोलतांना त्यांनी बैठकीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ”विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहोत. येत्या 7 तारखेला आम्ही सर्व एकत्र बसणार आहोत. त्यासाठी नाना पटोले, जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली. जागावाटपाबाबत 7 तारखेला प्राथमिक चर्चा होईल”, अशी माहिती बाळासाहेब थोरातांनी दिली.
याबाबत आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांना या बैठकीबाबत विचारले असता आम्हाला याबाबत माहित नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की, ”येत्या ७ तारखेला उद्धव ठाकरे स्वतः दिल्लीत आहेत. आम्ही सर्व जण दिल्लीमध्ये आहोत. त्यामुळे बैठक कोणी ठरवली हे मला माहित नाही”, असे स्पष्ट विधान राऊतांनी केले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली की काय अशा चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरच बाळासाहेब थोरात यांनी बैठकीची माहिती दिली होती. मात्र तरीही राऊतांनी याबाबत माहित नसल्याचे म्हंटले आहे.