नांदगाव वृत्तसंस्था
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अजूनही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसून आपण कोणाला पाठिंबा देणार हे गुरूवारी (ता.31) बैठकीनंतर जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यातच आता नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेत ‘तू बिनधास्त लढ संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे.’ असं जरांगे यांनी म्हटल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जरांगे पाटील यांनी कांदेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुहास कांदे काय म्हणाले?
सुहास कांदे म्हणाले, “मी मनोजदादांच्या तब्येतीची विचारपूस केली. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कामाबाबत त्यांना सांगितलं. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवसृष्टी उभारली आहे. त्याला पुष्पहार अर्पन करण्यासाठी यावं, असं त्यांना मी सांगितलं. त्यांनी देखील येण्याचं आश्वासन दिलं. तर यावेळी ते मला म्हणाले, ‘तू बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी राहिल.”
मनोज जरांगेंचे स्पष्टीकरण
सुहास कांदेना पाठिंबा दिल्याच्या चर्चांवर जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे म्हणाले, “मी कोणालाही पाठिंबा वगैरे काही दिलेला नाही. आमची बैठक झाल्यानंतरच आमचा निर्णय होणार आहे हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी एकालाही पाठिंबा दिलेला नाही.”