जालना वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतू माघार घेतली आहे. आज विधानसभा निवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबत त्यांनी समर्थकांना आपले अर्ज माघारी घेण्याचे आवाहन देखील यावेळी केले. तसेच जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरू राहाणार असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली तर भाजपमध्ये देखील काही लोक चांगले असल्याचे म्हटले आहे. विधासभेतून माघार घेतल्यानंतर आता काही उमेदवारांना पाडा ही तुमची भूमिका ठाम आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, हे एकदोन दिवसात जाहीर करेल. माझी विनंती आहे की सगळ्यांनी अर्ज काढून घ्या. एका जातीच्या आधारावर आपण जिंकू शकत नाही. निवडणूकीत जो आपल्याला संपवायला निघाला त्याला संपून टाकायचं. अपक्ष किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणालाच आपला पाठिंबा नाही. कोणाला देणार देखील नाही. आपल्या पोरांनाही विनंती आहे अर्ज मागे घ्या. पाडायचं की निवडून आणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. मी कोणालाच पाडा किंवा निवडून आणा म्हणणार नाही.
आपल्या मागण्या लिहून दिल्याशिवाय, व्हिडीओग्राफी केल्याशिवाय कोणालाही मतं देऊ नका. आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा, जगात कोणी कोणाचं नाही. या दोघानांही (महायुती आणि महाविकास आघाडी) मराठ्यांना लेखी देण्याची गरज वाटली नाही तर दोघांना पाडा आणि अपक्षाला निवडून आणा. आपल्या मागण्या मान्य असणाऱ्याला निवडून आणा, वेळ पडली तर ओबीसीच्या उमेदवाराला निवडून आणा पण यांना मात्र लिहून दिल्याशिवाय मते देऊ नका असेही जरांगे यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मधे बोलले तर त्यांना सोडणार नाही. त्यांच्याइतकं वाटोळं मराठ्यांचं कोणीच केलं नाही. ते मराठ्यांना खुन्नस देतात. आम्ही १५ महिने झाले आंदोलन करतोय, पण आमच्या छाताडावर नाचून १६ जाती आरक्षणात घातल्या पण आम्हाला मुद्दाम आरक्षण दिलं नाही. इतकी हीन वागणूक मराठ्यांना कोणीच दिली नाही. जगाच्या पाठीवर इतका विद्रूप माणूस मी कधीच बघीतला नाही, लोकांच्या लेकरांचे वाटोळे करून दात काढणारा पहिला माणूस मी बघीतला असेही जरांगे यावेळी म्हणाले.
यावर या टीकेमुळे तुम्ही भाजपविरोधी आहात असं चित्र तयार होतंय असं विचारलं असता जरांगे म्हणाले की, मी भाजप विरोधी कधी म्हणालो…. भाजपमधील काही लोक चांगले आहेत. भाजप संपवायला हे कुठून आले काय माहित, त्यांचे लोकही त्यांच्यावर (देवेंद्र फडणवीस) खूश नाहीत. त्यांचं ऐकलं नाही की जेलमध्ये टाकलं जातं. सत्तेत आलं की लोकांना जेलमध्ये टाक हे सुरू आहे. आरएसएसचे लोक देखील त्यांना वैतागले आहेत असेही जरांगे यावेळी म्हणाले.