हिंगोली : वृत्तसंस्था
मागच्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे नेहमीच चर्चेत असून आजही माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा नेत्यांना इशारा दिला. मराठा आरक्षणाबाबत सरकार काय काय करत आहे, किती गांभीर्याने घेत आहे हे समाज बघतोय. २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागेल याची खात्री आहे. मराठे राजकारण्यांना फिरून दारालाही शिवू देणार नाहीत. कारण आमच्यासाठी लेकरांचे हित महत्त्वाचे आहे. आम्ही ज्या नेत्यांना मोठे केले ते जर आमच्याच विरोधात जायला लागले तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या लेकरांचे भविष्य आणि ते मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. २४ डिसेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे त्यांना समजून येईल. धोडा धीर धरा.तुम्ही पलट्या का मारत आहात? तुम्ही विषय का घेत नाही याकडे आमचेही लक्ष आहे. तुम्ही काय करताय, काय करणार आहे यावर आमची बारकाईने नजर आहे. तुम्ही आम्हाला काय आश्वासनं दिलीत, गुन्हे, अटकेबाबत काय म्हटले. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनावर काय करताय यावर माझ्यासह मराठा समाजाचे लक्ष आहे. जरी माझा समाज गरीब असला आणि शेतात राबत असला तरी सरकार, आपण ज्याला निवडून दिले ते आपल्याबाबत अधिवेशनात काय भूमिका मांडत आहात हे बारकाईने पाहतोय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे पाहा असे ते म्हणाले.
तसेच मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवले. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल. एवढा पश्चाताप या लोकांना होईल की हा विषय आपण सोडवायला हवा होता. आता मात्र खेळ विचित्र झाला. काय समजायचे ते समजा, आम्हालाही काही मर्यादा आहेत. शेवटी आमचा संयम बघायला लागला तर आमचा नाईलाज आहे. आंदोलन शांततेत होणार, त्यावर मी आणि माझा समाज ठाम आहे.पण सरकारला पश्चाताप एवढा येणार की आजपर्यंत जीवनात कधीही आला नसेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, आज इंदापूरला छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होतेय त्यावर जरांगेंनी भुजबळांना सूचक सल्ला दिला आहे. सभा कुणीही घ्यावी. प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु जातीवाचक काही बोलू नये. तेढ निर्माण करू नये. घटनेच्या पदावर बसून कायदा आपण पायदळी तुडवायला नको याचे भान आपण ठेवले पाहिजे.वयाचाही विचार करून बोलले पाहिजे. शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्यांना शासन-प्रशासनाचा ४५ वर्षाचा अनुभव आहे.अशा माणसाने जातीय तेढ, दंगलीच्या भाषा करू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जर काही बोलले तर आम्ही बघू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.