मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस शुल्लक असून सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या असून मराठा- कुणबी नोदींचा अहवालही शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे. २४ डिसेंबरची तारीख जवळ आली असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
“आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान केला. २४ तारखेपर्यंत वेळ दिला. काल त्यांनी शिंदे समितीने अंतिम अहवालही दिला. ज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितली होती. आता 24 तारखेच्या आत कायदा करा. आज त्यावर चर्चा करुन मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा..” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच “या निर्णयासाठी दुसरे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. अहवाल आला आहे. नोंदीही मिळाल्या आहेत. त्यामुळे दुसरे अधिवेशन बोलावण्यची गरज नाही याच अधिवेशनात कायदा करावा. हेच अधिवेशन वाढवावे. मराठ्यांची नाराज अंगावर घेऊ नका. जर वेळेत निर्णय आला नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागेल..” असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला. “त्यांची गरळ ओकण्याची सवय जुनीच आहे. ते राजकीय फायद्यासाठी गोरगरिबांचा वापर करतात, हे गरिबांच्या लक्षात आले आहे. मात्र ओबीसी बांधवांनी त्यांना ओळखले आहे. आता त्याचा फायदा होणार नाही..” असे जरांगे पाटील म्हणालेत.