पुणे वृत्तसंस्था : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करत अचानक पुण्याकडे प्रयाण केल्याने राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पुण्याची वाट धरली असून, त्यांच्या या अचानक निर्णयामागे एमपीएससी विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नववर्षाच्या निमित्ताने शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील जनता आणि शेतकरी सुखी व समाधानी राहावेत, ही प्रार्थना त्यांनी साईचरणी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला असून, सरकार आणि संबंधित मंत्र्यांवर समाजाने विश्वास ठेवला असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुण्याकडे रवाना होण्यामागील कारण स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. सरकारच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. “विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना वाऱ्यावर सोडले जात असेल तर ही मोठी शोकांतिका आहे,” असे म्हणत त्यांनी या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत, पुण्यात जाऊन थेट एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या अचानक हालचालीमुळे पुण्यातील घडामोडींकडे राज्याचे लक्ष वेधले गेले असून, पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.