मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बदलत्या हवामानामुळे उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम आहे. आता पुढील 2 दिवस राज्यासह विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शुक्रवारी परभणीत नीच्चांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक भागात धुके पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किमान तापमान दोन ते तीन अंश घट होण्याची अंदाज आहे.
राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. शुक्रवारी परभणीसह धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव येथे तापमान 10 अंश किंवा त्यापेक्षा खाली कायम आहे. परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून सर्वत्र हुडहुडी भरली आहे. या जिल्ह्याचे तापमान 10.08 अंशापर्यंत गेले आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या चित्र दिसत आहे. गारवा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.