ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाची सर्वाधिक ७० मिमी नोंद लोणावळा येथे झाली. गेले दहा ते पंधरा दिवस जिल्ह्यात पावसाचा खंड होता. त्यामुळे कमाल तापमानात ८ ते १० अंशांनी वाढ झाली होती. मात्र, २२ रोजी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. २३ रोजीही काही भागांत जोरदार पाऊस झाला. दरम्यान, मान्सून २३ पासून राजस्थान, हरियाणा आणि गुजरात राज्याच्या काही भागांतून परतीला निघाला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात परतीचा पाऊस जोरदार सुरू झाला आहे. बुधवारी (दि. २५) पुणे व रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दरवर्षी परतीचा मान्सून १७ सप्टेंबर रोजी राजस्थानातून निघतो. मात्र, यंदा २३ रोजी निघाला असून, नियोजित तारखेच्या सहा दिवस उशिरा निघाला. मागच्या वर्षी तो २५ सप्टेंबरला निघाला होता.

मान्सून राजस्थानसह गुजरातमधील कच्छ भागातूनही निघाल्याने महाराष्ट्रावर त्याचा तत्काळ परिणाम दिसला. राज्यात मोठ्या पावसाचे कोणतेही अलर्ट नसताना अचानक २३ पासून पाऊस वाढला. प्रामुख्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात जोर जास्त आहे. सोमवारी पुणे शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच मंगळवारीही दुपारी सलग दोन ते अडीच तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली.

पुण्यासह सोलापूर, सातारा, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपाची पिकेही पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!