मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या अनेक वर्षांपासून मी मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी विषयाच्या लढ्यासाठी जेलमध्ये गेलो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच मराठी विषयाच्या सक्तीबाबत जेलमध्ये जावे लागते, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला जपलं पाहिजे. मराठीची व्याप्ती ही अत्यंत अफाट आहे. तरीदेखील आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत. सध्या राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहोत, त्यामुळे राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकणे हे सक्तीचे करायला हवे, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.
राज ठाकरे म्हणाले- महाराष्ट्रात काय ताकद आहे. हे मला जेव्हा कळालं, तेव्हापासून माझे मराठीविषयीचे प्रेम हे अधिकच वाढत गेले. माझ्या आजोबांचे, वडिलांचे आणि बाळासाहेबांचे लिखाण हे ज्यावेळी इतर भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. तेव्हा मला मराठीची आवड अधिक निर्माण होत गेली. मी अत्यंत कडवट मराठी आहे, कारण माझ्यावर त्याच पद्धतीचे संस्कार झालेले असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. अशी अवस्था आपल्या राज्यात असतांनाही अमेरिकेत मात्र शंभरपेक्षा अधिक मराठी शाळा उघडल्या जात आहेत, ही अत्यंत मोलाची बाब आहे. अमेरिकेमध्ये बृह महाराष्ट्र मंडळाने हे करून दाखवले आहे. त्यासाठी अमेरिकेत मला बोलावल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं.
मराठी माणसाला मराठी बोलण्याची लाज वाटते. इतर राज्यातले लोक त्यांच्या भाषेशिवाय अन्य भाषेला कधीही महत्त्व देत नाहीत. मग आपणच उगाच हिंदी भाषेत का बोलावं? महाराष्ट्रातल्याच काही जिल्ह्यांमध्ये हिंदी भाषा ऐकायला येते, तेव्हा अत्यंत वाईट वाटतं. मराठीला संपवण्याचा राजकीय प्रयत्न सुरू आहे. मात्र, तुम्ही मराठीची अस्मिता जपणं अत्यंत गरजेचं आहे. मराठीत जो विनोद होतो, तो कुठल्याही भाषेत होऊ शकत नाही. मराठी बोलण्याला संकुचित वाटू देऊ नका. तर मराठी बोलण्याने तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्यामुळे तुम्हाला कुणीही भेटलं तरी तुम्ही त्याच्याशी मराठीतच बोलायलं हवं, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.