ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू, सहा गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हातील वेटलापलेम गावात शनिवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये २० हून अधिक कर्मचारी काम करत होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. आवाज इतका तीव्र होता की तो सुमारे पाच किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्याच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे, कारण काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!