विशाखापत्तनम वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशच्या अनाकापल्ली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला. विशाखापत्तनमच्या दुव्वाडा येथून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 18189) च्या दोन एसी डब्यांना अचानक आग लागली. एलामंचिली रेल्वे स्टेशनजवळ रात्री सुमारे 1.30 वाजता ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या पँट्री कारजवळ असलेल्या बी-1 आणि एम-2 या एसी कोचमध्ये प्रथम आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत दोन्ही डबे पूर्णपणे जळून खाक झाले. त्यावेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा पसरू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग लागल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारत स्टेशन परिसरात धाव घेतली. संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला होता. घटनेची माहिती मिळताच अनाकापल्ली, एलामंचिली आणि नक्कापल्ले येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत दोन्ही कोच पूर्णपणे जळाले होते.
या दुर्घटनेत बी-1 एसी कोचमध्ये प्रवास करणारे विशाखापट्टणम येथील 70 वर्षीय चंद्रशेखर सुंदर यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच सुमारे 20 ते 22 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात बी-1 कोचमध्ये ब्रेक जाम झाल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे विशाखापत्तनम–विजयवाडा रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे 3.30 नंतर पर्यायी गाड्या आणि बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.