नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशची राजधानी ढाका या शहरात एका व्यावसायिका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या या इमारतीत जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत ७० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामध्ये ४२ जण बेशुद्ध होते. बांगलादेशचे आरोग्यमंत्री सामंत लाल सेन हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशीरा या इमारतीला आग लागली. पहिल्या मजल्यावर असलेल्या कच्छी भाई रेस्टॉरंटमध्ये रात्री ९.४५ च्या सुमारास आग लागली. आग लगेचच इतर रेस्टॉरंटमध्ये पसरली. आग लागली ती वेळ हॉटेल्ससाठी गर्दीची वेळ होती. त्यामुळे हॉटेल्समध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रेस्टॉरंटमध्ये असलेल्या गॅस सिलिंडर्समुळे ही आग वेगाने पसरली.
अग्नीशमन दलाच्या जवानांनी धक्कादायक माहिती दिली आहे. अनेकांनी इमारतीवरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर गुदमरूनदेखील अनेकांचा जीव गेला आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज आणि शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी येथे दाखल करण्यात आले आहे.