ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मायावतींनी केले भाचा आकाश आनंदला उत्तराधिकारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा सुप्रीमो मायावती यांनी रविवारी मोठा निर्णय घेत, भाचा आकाश आनंदला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. अर्थात मायावतीनंतर बसपाची धूरा २८ वर्षीय आकाशच्या हाती जाईल. उत्तरप्रदेश वगळता संपूर्ण देशात पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आनंदला देण्यात आली आहे. तसेच मायावतींनी आगामी लोकसभा निवडणुकीत दुप्पट मेहनत करत पक्षाचा जनाधार वाढविण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी केले. लोकसभेची निवडणूक मायावती यांच्याच नेतृत्वात लढवली जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बोलविण्यात आलेल्या देशभरातील नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मायावतींनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत लोकसभेच्या दृष्टिकोनातून सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मायावतींनी उत्तराधिकारी म्हणून आपला भाचा आकाश आनंदच्या नावाची घोषणा केली. आकाश हे मायावतीचे बंधू आनंद कुमार यांचे सुपुत्र आहेत. आकाशचे शालेय शिक्षण गुरूग्राममध्ये झाले आहे.

यानंतर आकाशने लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे. मायावतींनी पहिल्यांदा २०१७ साली आकाशला राजकीय मंचावर आणत तोच आपला उत्तराधिकारी असल्याचे संकेत दिले होते. नुकतेच आकाशचा विवाह पक्षातील वरिष्ठ नेते अशोक सिद्धार्थ यांची मुलगी डॉ. प्रज्ञा सिद्धार्थ हिच्यासोबत झाला होता. २०१९ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी आकाशला देण्यात आली होती. याशिवाय नुकतेच झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरमधील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आकाशकडे देण्यात आली होती

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!