सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेज सेंटर आणि एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग, बार्शी यांच्यात सामंजस्य करार झाला. यामुळे दोन्ही संस्थांच्या अभ्यासाविषयी विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना फायदा होणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
या करारावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार आणि एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या करारामुळे विद्यापीठ व रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज हे जोडले गेले असून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नव उपक्रम व नव उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विद्यापीठातील उद्यम इनक्युबेशन सेंटरचा हा पहिलाच सामंजस्य करार आहे. विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरमार्फत याआधी उद्योजकता प्रशिक्षण शिबीर व प्रदर्शन, ॲक्युप्रेशर नॅनो टेक्नॉलॉजी निर्मित कोविड सुरक्षा मास्क, हातमाग उपक्रम, लॅब ऑन व्हील प्रयोगशाळा, ऍग्रो टुरिझम असे विविध प्रकल्प यशस्वीरित्या राबवले गेले आहेत.
यावेळी डॉ. रश्मी दातार, प्रा. अमोल भोसले, प्रा. महेश केवडकर, प्रा. महावीर पाटील आदी उपस्थित होते.