मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय व महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या नंदुरबार जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ चक्क काही पुरुषांनी लाटण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ७१० पुरुषांनी या महिलांसाठीच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्याचे प्रशासनाच्या छाननीत निष्पन्न झाले आहे.
नंदुरबार जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत सध्या प्राप्त अर्जांची युद्धपातळीवर छाननी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान आधार कार्ड, बँक खात्याची माहिती तसेच लिंग (Gender) यांची पडताळणी करत असताना काही अर्जांमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्या. अधिक सखोल तपासणी केली असता महिलांसाठी राखीव असलेल्या या योजनेत ७१० पुरुषांनी खोटी माहिती देऊन अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले. या अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेचा आर्थिक लाभ मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हा प्रकार निदर्शनास येताच जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली. महिला व बालकल्याण विभागाने या सर्व ७१० पुरुष अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवून पोर्टलवरून तात्काळ बाद केले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा गैरप्रकार प्राथमिक छाननीतच पकडला गेल्याने एकाही पुरुष अर्जदाराच्या खात्यात योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे सरकारी निधीचा संभाव्य गैरवापर टळला आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने योजनेच्या अंमलबजावणीत अधिक काटेकोरपणा आणण्याचा निर्णय घेतला असून, आता प्रत्येक अर्जाची व जोडलेल्या कागदपत्रांची सूक्ष्म पातळीवर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केवळ महिलांसाठी असलेल्या योजनेत लिंग लपवून किंवा खोटी माहिती देऊन अर्ज करणे हा शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार मानला जात आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेचा मूळ उद्देश गरजू महिलांना आर्थिक आधार देणे हा असून, अशा गैरप्रकारांमुळे शासकीय यंत्रणेवर अनावश्यक ताण येत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या ७१० पुरुष अर्जदारांवर फौजदारी कारवाई होणार का, याकडेझ संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. योजनेच्या पारदर्शकतेबाबतही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.