ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘विलीनीकरण झालंच नाही; आधीच पदवाटप?’ : रोहित पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांचा टोला

नाशिक : वृत्तसंस्था

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल झाले असते, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्या अनुषंगाने अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली. “रोहित पवार सांगत आहेत की अजितदादांनी त्यांच्या सोबत काही ठरवलं होतं. मात्र आम्हाला तसं काहीही सांगितलेलं नव्हतं. पक्षात अधिकृतपणे कोणतेही निर्णय झाल्याची माहिती नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भुजबळ पुढे म्हणाले, “विलीनीकरण अजून झालेलेच नाही, आणि त्याआधीच कोण कोणत्या पदावर बसणार हे ठरले असेल, तर त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यायची? उपमुख्यमंत्री कोण होणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, हेही कदाचित ठरले असेल,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

सध्या पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात असल्याचे सांगत, “त्यांना पूर्ण सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. नवीन नेतृत्व जे निर्णय घेईल, त्यानुसार पुढील भूमिका ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले. “आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहेत; अधिक माहिती त्यांच्याशी बोलावी,” असे म्हणत त्यांनी विषय अधिक न वाढवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र अजितदादा आता हयात नसल्याने या विषयावर सविस्तर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही, जर विलीनीकरण झाले असते, तर नेतृत्वात बदल झाले असते, असा त्यांचा दावा होता. प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा हवा, ही अजितदादांची इच्छा होती आणि त्या संदर्भात अमोल कोल्हे यांच्या नावावर चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी हेही स्पष्ट केले की, ही केवळ राजकीय नव्हे तर भावनिक इच्छाही होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि कुटुंब पुन्हा एकत्र यावे, असे अजितदादांना वाटत होते. संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे यांची नियुक्ती व्हावी, अशी त्यांची भूमिका होती, असेही त्यांनी नमूद केले. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींविषयी चर्चांना पुन्हा उधाण आले असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!