महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठीही कोरोना लस उपलब्ध करा,मिलन कल्याणशेट्टी यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
अक्कलकोट,दि.३ : सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापुर सिनेट सदस्य तथा नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रति आरोग्यमंत्री राजेश टोपे , शिक्षणमंत्री उदय सामंत व कुलगुरू यांना दिल्या आहेत.शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांपूढील सर्वांना लवकरात लवकर कोविड -१९ वॅक्सिन डोस देणे गरजेचे आहे.या अनुषंगाने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना हा डोस देणे आवश्यक आहे. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व केंद्रावर वॅक्सिनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महाविद्यालयीन बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचारी वॅक्सिन घेण्यापासून वंचित राहत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापुर संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयात कोविड -१९ वॅक्सिन उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वेळेत डोस देणे सुलभ होईल. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चित मदत होईल.
तातडीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांत वॅक्सिन उपलब्ध करून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना डोस देण्याची व्यवस्था
करावी,अशी विनंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापुर सिनेट सदस्य तथा नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे , शिक्षणमंत्री उदय सामंत व प्र.कुलगुरू यांना पत्राद्वारे केली आहे.
प्रशासनाने तात्काळ
निर्णय घ्यावा
ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा
विषय महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने त्यांच्या आरोग्याची काळजी देखील सरकारने घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपण ही मागणी केली आहे याचा प्रशासनाने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा.
मिलन कल्याणशेट्टी,नगरसेवक