सातारा : वृत्तसंस्था
राज्यात मिनी काश्मीर म्हणून ओळखली जाणारी महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळे वीकएंडसह सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बहरून गेली आहेत. निसर्गसौंदर्य, थंड हवा व आल्हाददायक वातावरणाने पर्यटक खूश होत आहेत. वेण्णालेक, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरांसह विविध प्रेक्षणीय स्थळांवरही पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. पर्यटकांच्या आगमनाने उन्हाळी हंगामाचा आता खर्या अर्थाने प्रारंभ झाला आहे.
महाबळेश्वर, पाचगणीत शुक्रवारपासून पर्यटकांची इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी धुकं व थंड वातावरण अनुभवयास मिळत आहे. या बदललेल्या वातावरणाचा पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडविक पॉईंट शहरानजीकचा सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉईंट, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉईंटसह विविध प्रेक्षणीय स्थळांवर फेरफटका मारत आहेत.
महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत सायंकाळी पर्यटकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. बाजारपेठेतील प्रसिद्ध आकर्षक अशी लाकडी काठी, विविध आकर्षक वस्तू, प्रसिद्ध चप्पल खरेदीसह चना चिक्की फज असे महाबळेश्वरी पदार्थ खरेदीसाठी पर्यटकांचा कल वाढला आहे. सध्या मुख्य बाजारपेठेत सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून पर्यटन महोत्सवाआधी हे कामे पूर्णत्वास जाणार आहेत. येत्या उन्हाळी हंगामात बाजारपेठेचे आगळेवेगळे रूप पर्यटकांना पहावयास मिळणार आहे.