ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश : कॉंग्रेस फोडा…

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल चढविला आहे.

पुण्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. कॉंग्रेसमधून कोणी आले तरी तुमचं विचार अगोदर करणार, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज जिल्ह्याची बैठक पार पडली, सगळ्यांचा सत्कार करण्यात आला. पुढच्या काळात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना दिल्या आहेत.पुणे जिल्ह्याला मजबूत जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाऊ. येणाऱ्या एक महिन्यामध्ये महामंडळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करणार आहे. राज्य सरकारचे महामंडळ लवकरच जाहीर होतील. आम्हाला आता कानमंत्र देण्याची गरज नाही. पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात आमचे महायुतीचे सरकार असेल, असे बावनकुळे म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपली काहीतरी गल्लत होत आहे. प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक नेते गेले पाहिजे असं होत नाही. अजित पवार दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम करत आहेत, सगळे नेते आपापले काम करत आहेत. आता इथून चंद्रकांत पाटील चार कार्यक्रमाला गेले मी त्यांना सांगितलं की वेगळे कार्यक्रम करा. या राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक कामं झाली पाहिजेत त्यामुळे प्रत्येक नेते त्या त्या कार्यक्रमाला हजर राहतात,आम्ही सगळ्यांनी काम वाटून घेतले आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय राऊत काहीही बोलतात, काहीही लिहितात. महाराष्ट्राने आता संजय राऊतांना ऐकणे बंद केला आहे. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही लोक ऐकतात आणि सोडून देतात. संजय राऊत यांच्या बद्दल महाराष्ट्र आता गंभीर नाही. पुस्तक त्यांनी, लिहिल त्यांनी छापले आणि तेच वाचतील. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंचा शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत त्यांना त्यांची पार्टी संभाळता येत नाही तर आम्ही काय करावे. शिवसेना ठाकरे गटाचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत आता आम्ही काय करायला हवे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. संग्राम थोपटे यांनी सगळे काँग्रेसला दिले तरी सुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कुठले ही धोरण काँग्रेसला नाही. जो जो काँग्रेस किंवा इतर पार्टी मधून आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेसला रिकामी करा. तुम्ही थकून जाल इतके जण आमच्याकडे येत आहेत. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार, असे आश्वासन बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!