नागपूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येत असतांना अनेक दिग्गज नेते मोठे दावे करीत असतांना नुकतेच नागपुरात भाजपचे दिग्गज नेते मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे विधान केल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ माजली आहे.
मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, ‘लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर होता. ही संधी साधून विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून तुम्ही पंतप्रधान व्हा, आम्ही पाठिंबा देतो, अशी ऑफर दिली होती,’ असा गौप्यस्फोट स्वत: गडकरी यांनी शनिवारी केला. मात्र मला या पदाची लालसा नाही, असे सांगून ही ऑफर नाकारल्याचे गडकरी म्हणाले.
नागपुरातील पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘मी कुणाचेही नाव घेणार नाही. पण विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने मला ऑफर दिली होती की, जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत. पण मी त्यांना सांगितले, तुम्ही मला पाठिंबा का द्याल? आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणे हे माझ्या जीवनाचे लक्ष्य कधीच नाही. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. पदासाठी मी पक्षाशी तडजोड कदापि करणार नाही. माझा दृढनिश्चय माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.’ गडकरींनी अजून एक किस्सा सांगितला. ‘एक भाकप नेते मला भेटण्यास आले. मी त्यांना म्हणालो नागपूर व विदर्भात ए.बी. वर्धन मोठे नेते होते. त्यावर ते म्हणाले, ‘ते तर संघाचे विरोधी होते?’ त्यावर मी म्हणालो, ‘प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्यांचाही सन्मान करायला हवा. ज्याच्या विरोधात बेइमानी आहे त्यांचा सन्मान कोण करेल?’
गडकरी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. गडकरी यांचे सर्वच राजकीय पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत. विशेषत: इंडिया आघाडीत महत्त्वाचे स्थान असलेल्या शरद पवार यांच्याशीही गडकरी यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पवारांनी तर गडकरींना ऑफर दिली नसेल ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर आताच गडकरींनी हा गौप्यस्फोट का केला, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.