मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या आता पुन्हा एकदा अडचणी वाढताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा करत 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या काळात पिकविमा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यात आता भर म्हणजे करुणा शर्मा यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली होती. आता सुप्रिया सुळे यांनी बीड प्रकरणी लक्ष घातल्यानंतर आता करुणा शर्मा यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. करुणा शर्मा यांनी सुप्रिया सुळे यांना भेटीसाठी वेळ मागितला होता. अखेर, आज करुणा शर्मा यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेऊन आपली बाजू त्यांच्याकडे मांडली आहे.
या भेटीमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, याबाबतची चर्चा झाली. तसेच, सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत त्यांनी माहिती दिली. करुणा शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
दरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली होती. यात कोर्टाचा निकाल करुणा शर्मा यांच्याकडून लागला असून त्यांना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. त्यात त्यांच्या राजीनाम्याची देखील मंगणीने जोर धरला आहे. एवढ्या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
संतोष देशमुख प्रकरणी वाल्मीक कराडला अटक झाली त्यानंतरपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जातो. तसेच कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे देखील अंजली दमानिया यांनी कागदोपत्री दाखवले होते. अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.